म्हणे दास सायास त्याचे करावे।
जनीं जाणता पाय त्याचे धरावे॥
गुरू अंजनेवीण तें आकळेना।
जुने ठेवणे मीपणे ते कळेना॥१४१॥
कळेना कळेना कळेना कळेना।
ढळे नाढळे संशयोही ढळेना॥
गळेना गळेना अहंता गळेना।
बळें आकळेना मिळेना मिळेना॥१४२॥
अविद्यागुणे मानवा उमजेना।
भ्रमे चुकले हीत ते आकळेना॥
परीक्षेविणे बांधले दृढ नाणें।
परी सत्य मिथ्या असें कोण जाणें॥१४३॥
जगी पाहतां साच ते काय आहे।
अती आदरे सत्य शोधुन पाहे॥
पुढे पाहतां पाहतां देव जोडे।
भ्रम भ्रांति अज्ञान हें सर्व मोडे॥१४४॥
सदा वीषयो चिंतितां जीव जाला।
अहंभाव अज्ञान जन्मास आला॥
विवेके सदा स्वस्वरुपी भरावे।
जिवा ऊगमी जन्म नाही स्वभावें॥१४५॥
दिसे लोचनी ते नसे कल्पकोडी।
अकस्मात आकारले काळ मोडी॥
पुढे सर्व जाईल कांही न राहे।
मना संत आनंत शोधुनि पाहे॥१४६॥
फुटेना तुटेना चळेना ढळेना।
सदा संचले मीपणे ते कळेना॥
तया एकरूपासि दूजे न साहे।
मना संत आनंत शोधुनि पाहें॥१४७॥
निराकार आधार ब्रह्मादिकांचा।
जया सांगतां शीणली वेदवाचा॥
विवेके तदाकार होऊनि राहें।
मना संत आनंत शोधुनि पाहे॥१४८॥
जगी पाहतां चर्मलक्षी न लक्षे।
जगी पाहता ज्ञानचक्षी निरक्षे॥
जनीं पाहता पाहणे जात आहे।
मना संत आनंत शोधुनि पाहे॥१४९॥
नसे पीत ना श्वेत ना श्याम कांही।
नसे व्यक्त अव्यक्त ना नीळ नाहीं॥
म्हणे दास विश्वासतां मुक्ति लाहे।
मना संत आनंत शोधुनि पाहे॥१५०॥
रोज मराठी साहित्य, लेख वाचण्यासाठी नक्कीच Subscribe करा.
Discussion about this post
No posts